पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे पत्नीशी गप्पा मारत बसल्याच्या रागातून तरूणाला दोन जणांकडून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद बाबुराव बारी (वय-३०) रा. शेंदुर्णी ता.जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बँड पथकात वाजा वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. २० मे रोजी रात्री ८ वाजता शरद बारी हा बँड पथकात काम करणारा मोहसीन कामावर आला नाही. त्यावेळी शरद हा मोहसीनच्या घरी आला. त्यावेळी मोहसीन घरी नव्हता. त्यानंतर शरद बारी हा मोहसीनच्या पत्नीशी गप्पा मारत होता. याचा राग आल्याने अकील खाटीक आणि त्याचा मुलगा गुड्डू (पुर्ण नाव माहित नाही) या दोन जणांनी शरद बारी याला बेदम मारहाण केली व जवळ असलेला दगड डोक्यात मारून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर सोमवारी २२ मे रोजी शरद बारी याने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी दिलीप पाटील करीत आहे.