शेंदुर्णी प्रतिनिधी । शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन व माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांचा २६ एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त परीसरातील २ हजार ५०० गरजू कुटूंबांना संसारोपयोगी किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय गरुड यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे संचारबंदी असल्याने हात मजुरीवर असलेल्या आणि गोरगरीब जनतेला उदरर्निवाह करणे कठीण झालेले आहे. अश्या परिस्थितीत कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार गरीबांना वाटप करण्यासाठी जीवनावश्यक साहित्य जमा केले. संजय गरुड यांच्या वाढदिवशी म्हणजे २६ एप्रिल रोजी शेंदुर्णी नाचणखेडा गटातील गरजुंना या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
गरजू गरिबांना देण्यात येणाऱ्या किराणा किट मध्ये साखर, चहा पावडर, हळद, मिरची पावडर, मीठ, रवा, तुरडाळ, तांदुळ, गहु, ज्वारी, तेल, डेटॉल व सॅनिटायझर अश्या साहीत्याचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे. यासाठी आचार्य गजाननराव गरुड सहकारी पतसंस्था, शेंदुर्णी नगर एकता गणेश मित्र मंडळ, सखी महिला मंडळ, त्रिविक्रम महिला डेअरी, सखी महिला मंडळ, गरूड महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ या सामाजिक संस्था तर स्वतः संजय गरुड, प्रफुल्ल शेठ लोढा, पंडीतदादा गरूड, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, किशोर पाटील, शांताराम गुजर आणि इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्यातुन साहित्य गोळा करण्यात आले आहे.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिक्रिया व आवाहन करतांना गरजुंना मदत करा याच माझ्यासाठी सदिच्छा असे संजय भास्करराव गरुड यांनी सांगितले आहे. दरवर्षी २६ एप्रिल रोजी सर्व आप्तेष्ट मित्र परिवार कार्यकर्ते मिळून मोठ्या उत्साहाने माझा जन्मदिन साजरा करीत असतात. आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने, सहकार्याने मी आपल्या घराण्यापासून चालत आलेल्या सेवेचे व्रत अंगीकारून आजपर्यंतचा पल्ला गाठला. अश्याच सदिच्छा, शुभार्शिवाद कायम राखत मी अविरतपणे आपल्या सेवेत कार्यरत राहील. परंतु यावर्षी देशावर व संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे देशावर व राज्यावर जनतेच्या आरोग्याबरोबरच आर्थिक महासंकट उद्भवल्यामुळे गोरगरीब घरातील माझ्या लोकांना पुरेशे जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे.
कोट
माझ्या जन्मदिनी भेट म्हणून पुष्पगुच्छ, शाल, हार, श्रीफळ आदींवर होणारा खर्च आपण आपल्याच परिसरातील गरजू व गरीब कुटुंबांना धान्य व जीवनोपयोगी अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करून त्यांचा दुवा घ्यावा, आपले शुभार्शिवाद, शुभेच्छा, सदिच्छा माझ्या पाठीशी राहणारच आहे यात काही शंका नाही. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनचे व सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून कुणीही भेटायला किंवा शुभेच्छा देण्यास येऊ नये. आपले आशीर्वाद व शुभेच्छा मोबाईल व सोशल मिडीयाच्या माध्यमातून द्या मी शुभेच्छांचा स्वीकार करेन असे आवाहनही संजय गरुड यांनी केले आहे.