शेंदुर्णी प्रतिनिधी । संपुर्ण राज्यात लॉकडाऊमुळे देशी विदेशी दारू, बियरबार आणि गुटख्याची दुकाने बंद करण्याचे आदेश असतांना शेंदुर्णी येथे बेकायदेशीर देशी दारू व गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असून याकडे उत्पादन शुल्क विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेंदुर्णीकरांकडून होत आहे.
संपूर्ण राज्यात लॉक डाउन अंतर्गत देशी दारूची दुकाने, बियरबार गेल्या ३ आठवड्यापासून पूर्णपणे बंद असतांनाही शेंदूर्णीत मात्र दारुडे नियमितपणे झिंगत असल्याचे दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अश्या दारुड्यांना दारू उपलब्ध होतेच कशी? हा सामान्यांसाठी संशोधनाचा विषय आहे. ६० रुपये किंमतीची देशीची बाटली ९० रुपयात का होईना पण नियमितपणे उपलब्ध होत असल्याची माहिती तळीरामांकडून मिळत आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या प्राण रक्षणासाठी आधी राज्य सरकारने व नंतर केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू असल्याने सीआरपीसी भादंवी १४४, साथ रोग नियंत्रण कायदा लागू असल्याने भादंवी १८८ नुसार कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त झाले आहेत. तसेच राज्यात गुटका विक्रीस कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन खात्यावर गुटखा बंदी राबवण्याची जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गुटख्याच्या होणाऱ्या परिणामाचा विचार करता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात गुटखा बंदी करून आपल्या महसूलावर आधीच पाणी सोडले आहे. परंतु संपूर्ण लॉकडाउनची परिस्थिती असतांनाही येथे राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गुटखा व तत्सम उत्पादनांची विक्री सुरूच असून गुटका माफिया १० रुपये किंमतीची विमल २० रुपयात दामदुप्पट भावाने गुटका विक्री करून स्वतःची चांदी करून घेत आहेत.
जिल्ह्याच्या व राज्यांच्या सीमा सील असतांना व अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना रस्त्यावर धावण्याची परवानगी नसतांनाही परराज्यातील गुटखा शेंदूर्णीपर्यंत पोहचतोय. याविषयी अन्न व औषध प्रशासन खाते निद्रिस्त असून पोलीस खात्याने सुध्दा सोयीस्कर कानाडोळा केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी प्रखर नाराजी व्यक्त केली आहे.
उत्पादन व वाहतूक समस्येमुळे जीवनावश्यक किराणा व भाजीपाला दरांमध्ये थोडीफार भाववाढ झाली की सर्वत्र ओरड होत असते. तहसीलदार पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने पाठविली जातात. सामान्य नागरिकांविषयी काही समाज सेवक जागरूक असल्याचा आव आणत असतात तर गुटका व अवैध दारु विक्री सारख्या बेकायदेशीर कृत्यावर मग सोयीस्कर मौनव्रत का पाळतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.