शुभवार्ता : नाशिक विभागातून 407 रूग्ण कोरोनामुक्त !

 

नाशिक (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आज प्राप्त झालेल्या (बुधवार, 13 मे 2020) माहितीनुसार नाशिक विभागातून पाचही जिल्ह्यातील 407 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नाशिक विभागातून 10 हजार 170 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी विभागात एकूण 8 हजार 194 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 827 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे.

 

विभागात सर्वाधिक २९१ कोरोनामुक्त रूग्ण नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या 3 हजार 828 स्वॅबच्या नमुन्यांपैकी 3 हजार 9 तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 76 अहवाल प्रलंबित आहेत. जळगाव जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या 2 हजार 352 स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 683 अहवाल निगेटीव्ह आले असून 439 अहवाल अप्राप्त आहेत. तर 29 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यात प्राप्त माहितीनुसार 1 हजार 782 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 680 निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त 40 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 अहवाल प्रलंबित आहेत. धुळे जिल्ह्यातील 1 हजार 285 कोरोना संशयितांचे घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 33 संशयिताचें अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 180 अहवाल प्रलंबित आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 923 स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत 789 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 111 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आहे.

 

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयात तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांमधील सुविधा देखील सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सुचना विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्हा पातळीवर देण्यात आल्या आहेत.

Protected Content