जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील हुडको परिसरात चोरट्यांना कुटुंबियांच्या सतर्कतेने चोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दोघांना पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर इतर दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चॉंदखान पठाण वय ५२ यांचे दुमजली घर असून ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २१ रोजी रात्री ११.३० वाजेच्या जेवणानंतर सर्व कुटुंबिय सुमारास जिन्याचे दुसर्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. तर नदीम हा गच्चीवर गेला. यादरम्यान चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. नदीम याला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घराच्या खालच्या मजल्यावर आवाज आला. त्याने याबाबत वडील मेहमूद खान यांना कळविले. यानंतर मेहमूद खान हे मुलगा नईम यांच्यासोबत नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी खाली उतरत असतांना त्यांना जिन्यात दोन जण बसलेले दिसले. लाईट सुरु करताच इतर दोन जण पळाले. त्यांच्यासोबत पाठोपाठ घरात घुसलेले दोन जण पळतांना दिसले. मेहमूद खान व मुलगा नईम यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. व दोघांना पकडले. दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता किरण अनिल बाविस्कर व सिध्दार्थ राजू तायडे अशी दोघांची नावे निष्पन्न झाले असून उर्वरीत दोघांचा शोध सुरु आहे. शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे