शिवसेनेच्या संपर्क अभियानात संघटन बळकटीचे प्रयत्न

 

 

मुंबई : प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनंतर आता शिवसेनेने शिव संपर्क अभियानाची घोषणा केली असून यातून संघटन बळकटीकरणाचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

 

शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल  वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्प अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले. २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान शिवसेना पदाधिकाऱयांनी गावागावात संघटनात्मक बांधणीवर अधिक भर द्यावा. कोरोनाचे निर्बंध पाळूनच हे अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

 

या माध्यमातून शिवसेना पदाधिका़र्‍यांनी ३६ जिह्यांतील शिवसेनेची बुथबांधणी किती झाली याची खातरजमा करावी. जनतेपर्यंत पोहोचून शिवसेनेने केलेल्या विकासकामांची त्यांना माहिती द्यावी. त्याचप्रमाणे त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यावे, असे शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितल्याचे अनिल देसाई म्हणाले. बैठकीला शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब, पक्षप्रतोद सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

Protected Content