मुंबई प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजपने सेनेला धक्का दिल्याचे मानले जात आहे.
कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबरला होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला धक्का देत सेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यासह नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक पाहणी दौर्यावर आहेत. या दौर्यादरम्यान भाजपने सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनं हुंदका दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले.