मुंबई (वृत्तसंस्था) पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळविला असल्याचे वृत्त आहे.
महाविकास आघाडीत मित्रपक्ष असतानाही मित्रपक्षांच्या नेत्यांनाच आपल्या पक्षात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाबद्दल शिवसैनिकांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी आल्याचीही माहिती आहे. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर मात्र, तणाव चांगलाच वाढला. या राजकीय खेळीनंतर उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ता अबाधित ठेवायची असेल, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना परत पाठवा, असा थेट निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना पाठवला असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निरोपानंतर अजित पवार यांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले असल्याचे कळते.