जळगाव प्रतिनिधी । कोणतेही सबळ कारण नसतांना महापौरांचा सत्कार करणार्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी अलीकडेच झालेल्या महासभेच्या आधी महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती कैलास सोनवणे यांचा अगदी वाजंत्री लाऊन जाहीर सत्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे जळगावकर बुचकळ्यात पडले आहेत.
दरम्यान, याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत त्यांनी सर्व शिवसेना नगरसेवकांना बोलावून घेत बैठक घेतली. राज्यात भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याची कोणतीच संधी सोडत नसताना जळगावात विरोधाभास निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त केली. पालिकेत पक्षाच्या माध्यमातून कोणतीही भूमिका मांडायची असल्यास आधी वरिष्ठांशी चर्चा करावी. त्यानंतरच निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.