शिवराज्यभिषेक शासकीय पातळीवरून होणार साजरा !

 

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षापासून शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिध्द होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ६ जूनला राज्याभिषेक दिन हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार नाही. पण आचारसंहिता संपल्यावर हा निर्णय जाहीर करता येईल.

शिवराज्य दिनाच्या अंतर्गत या दिवशी राज्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषदांवर भगव्या रंगाची गुढी उभारण्यात येणार असून महाराष्ट्र गीत गायनानंतर छत्रपती शिवरायांच्या आदेशपत्राचे जाहीर वाचन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा यादृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे. आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा, पण आता हा दिन राज्यभर साजरा करण्याची योजना असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

Protected Content