जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यरत आहे. या योजनेत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रिडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडू असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link (लिंक) वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 5 फेब्रुवारी, 2020 पर्यत सादर करावेत. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांनीही आपला अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयात 5 फेब्रुवारी पर्यंतच सादर करावयाचा आहे.
अधिक माहिती व पात्रतेचे निकष व नियमावली जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर जावून 24 जानेवारी, 2020 चा शासन निर्णय पहावा. अधिक माहिती व काही अडचणी असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.