अमळनेर प्रतिनिधी । मित्रांसोबत दुचाकीने शिर्डी येथून अमळनेर येथे परतत असतांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना मालेगावजवळील जळगाव चोंडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे अमळनेरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील झामी चौक व बालाजी पुरा येथील रहिवाशी असलेले विकास जगन्नाथ ईशी (वय-२९), गणेश चौधरी (वय-३२), प्रितम गुलाब ठाकूर आणि चंद्रकांत पाटील हे चारही मित्र असून १४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रितमचा भाऊ हर्षल ठाकूर याला घेण्यासाठी दोन दुकाची घेवून निघाले होते. रात्री शिर्डी येथून एका दुचाकीवर तीन तर दुसऱ्या दुचाकीवर दोन असे पाचजण परत अमळनेरकडे येण्यासाठी निघाले होते. मालेगाव-पुणे या महामार्गावर असलेल्या जळगाव चोंडी गावाजवळ भरधाव ट्रकने तिघे जणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विकास ईशी जागीच ठार झाला, गणेश चौधरी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर प्रितम ठाकूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीस मालेगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.