यावल | तालुक्यातील शिरसाड येथील दंगल प्रकरणी यावल न्यायालयाने ११ आरोपींना सक्त मजुरीची व एकूण १ लाख २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तालुक्यातील शिरसाड येथे ११ सप्टेंबर २०१७ रोजी दंगल उसळली होती. येथील मुलगी फिर्यादी वसंत मंगा इंगळे यांच्या मुलासोबत पळून गेल्याच्या संशय होता. त्यानुसार आरोपी छायाबाई सोनवने, अनिल धोंडू सोनवने, जितेंद्र धोंडू सोनवने, धर्मा उर्फ धर्मेंद्र धोंदु सोनवने, किरन धोंडू सोनवने, प्रभाकर पुना जाधव, रमेश यशवंत भालेराव, किशोर रमेश भालेराव, आशा प्रभाकर जाधव, संगीता रतीलाल भालेराव, राजु रतीलाल भालेरव, विनोद रतीलाल भालेरव (सर्व रा. शिरसाड) यांनी फिर्यादीला मारहाण केली.खटल्याचे कामकाज सुरु असतांना एक आरोपी रमेश भालेराव याचे निधन झाले होते. त्यामुळे ११ आरोपींविरुद्ध न्यायाधीश डी.जी. जगताप यांच्यासमोर खटला चालला, दहा साक्षीदार तपासले.
न्या. जगताप यांनी आरोपी अनिल सोनवने यास ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची तसेच अन्य सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवून २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच सर्व आरोपींना मिळून १ लाख २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याच प्रमाणे या दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये फिर्यादी वसंत इंगळे यांना नुकसानीपोटी देण्याचा आदेश न्यायालयाने केला.