शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी – लेखिका डॉ. विजया वाड

भुसावळ प्रतिनिधी । प्रत्येक मूल आपले प्रगती पुस्तक आनंदाने घरी घेऊन जाईल, त्यासाठी शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण देणे हेच ध्येय आयुष्यभर ठेवले. आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात शिकून देखील जगात इतकी प्रगती करू शकले याचा अभिमान वाटतो. शिक्षक होता आल्याने जन्म सार्थकी लागला, असे मत दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “बालसाहित्यिका : गिरिजा कीर” या पाठाच्या लेखिका डॉ. विजया वाड यांनी मांडले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या सत्रात डॉ. वाड बोलत होत्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व नियोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. डॉ. वाड आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मुले शिक्षकांवर मनापासून अकृत्रिम प्रेम करतात. जीवनाचे नवे नवे धडे मुले शिकवतात. मी स्वतः अकरावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले असून आठवीत इंग्रजीला बाळासाहेबांच्या कृपेने सुरूवात झाली होती. तरीसुद्धा भाषा शिकता येत असल्याने आज चौदा देशात अस्खलित इंग्रजी व्याख्याने दिली.

मराठी माध्यमाची मुले कुठेही कमी पडत नाहीत, याचा खूप खूप अभिमान वाटतो. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची बीजे शिक्षकांनीच पेरायची असतात. कुठे जन्म घेतला याला महत्त्व नाही तर तुम्ही तुमच्या पराक्रमाने मोठे होणार आहात, हे विद्यार्थ्यांना ठासून सांगायला हवे. मी खूप बालसाहित्य लिहिले, विश्वकोशाचे देखील काम केले, त्यातूनही आनंद मिळाला. गिरिजा कीर आवडत्या लेखिका असल्याचे डॉ. वाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तब्बल तासभर डॉ. वाड यांनी आपल्या लेखन व अनुभवाचा प्रवास आपल्या अमोघ वाणीतून मांडला. त्यामुळे कान तृप्त झाल्याच्या प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केल्या. शैलेंद्र महाजन यांनी डॉ. वाड यांचा परिचय करून दिला. बलवाडी, ता. रावेर येथील विद्यार्थिनी तेजस्विनी चौधरी हिने आभार मानले.

Protected Content