प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये 69000 जागांवरील शिक्षक भरती घोटाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या प्रयागराजचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांची अचानक बदली करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे सत्यार्थ यांना पद न देता प्रतिक्षा यादीत ठेवले आहे. त्यामुळे योगी सरकारवर पिडीत उमेदवारांनी टीका करत बदलीचा निषेध केला आहे.
प्रयागराजच्या सोराव पोलीस ठाण्यामध्ये एका परिक्षार्थीने तक्रार केल्यानंतर पंकज यांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी हा मोठा घोटाळा उघड केला होता. 69000 सहाय्यक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची चौकशी पंकज यांनी स्वत:च्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती. या तपासाची जबाबदारी त्यांनी दोन धडाडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांकडे सोपविली होती. या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कॉपी करणाऱ्या नेटवर्कला उद्ध्वस्त केले होते. या कारवाईमुळे या घोटाळ्यातील आरोपींची धरपकड व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता पंकज यांच्या बदलीवरून उत्तर प्रदेशमधील वातावरण तापू लागले आहे. त्यांनी शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणल्यानेच बदली करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.