जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेची कार्यकारी मंडळाची सभा संघटनेच्या कार्याध्यक्ष अँड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार रोजी भगीरथ के सोमानी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे संपन्न झाली.
या सभेत शैक्षणिक संस्थांमधील नोकरभरतीचा अधिकार हा खासगी शिक्षण संस्थांचा घटनात्मक अधिकार आहे यावर अतिक्रमण करून शासनाने सुरु केलेले पवित्र पोर्टल प्रणाली ही तातडीने रद्द करण्याचा निर्णय पारित करावा अशी जोरदार मागणी संस्थाचालकांनी केली. यासोबतच वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार तातडीने द्यावे. कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020 21 नुसार संच मान्यता देत ज्याप्रमाणे सवलत देण्यात आली होती त्याच प्रमाणे सन 2021 22 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता मिळावी. या शैक्षणिक वर्षात कोणीही शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना अतिरिक्त घोषित करण्यात येऊ नये. दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेली संच मान्यतेचे प्रकरणी त्वरित दुरुस्त करून निकाली काढावी. शैक्षणिक संस्थांना वीज व पाणी वापराची बिले घरगुती दराने आकारणी करून सुधारित शासन आदेश पारित करावा. इमारत कर माफ करण्यात यावा. शालार्थ मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावी. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्याना तातडीने मान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटना पातळीवर पाठपुरावा सातत्याने केलेला असूनही शासनाने मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संस्थाचालक महामंडळाने येत्या बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयास जिल्हा संस्थाचालक संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे. तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे उपस्थितीत जिल्ह्यातील संस्थाचालकांची लवकरच तक्रार निवारण सभा आयोजित केली जाणार आहे.
या सभेस संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष व्ही. टी. जोशी, जीवन खिंवसरा, सरचिटणीस संजय सोमानी, चिटणीस शकील पटेल, उपकार्याध्यक्ष महेंद्र मांडे, कार्यकारणी सदस्य शैलेश राणे, जी. एम. महाजन, डॉ. नरेंद्र कोल्हे, निखिल मुंदडा, निलेश बारी, विजय कोटेचा, घनश्याम बडगुजर, मधुकर पवार, राजेंद्र महाजन, बाळासाहेब देशमुख, लिपिक मनोज वाघ आदी उपस्थित होते.