मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील व पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपवाल्यांनो सावधान, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. संजय राऊत यांनी उध्दव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीच्या दुसर्या भागात त्यांनी पुन्हा एकदा राजकीय विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली असून काल याचा पहिला भाग दाखविल्यानंतर आज दुसरा भाग प्रदर्शीत करण्यात आली. यात ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीकास्त्र सोडले. यात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतांना ते म्हणाले की, उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजून पंतप्रधान पदावर देखील दावा करतील ! तर, स्वत: शिंदे यांनी आधी भाजपची तक्रार करून आपल्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. आणि याच्या पुराव्याची क्लीप देखील आपल्याकडे असल्याचे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार? जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. जर मला शिवसेना वाढवायची नसेल तर माझा पक्ष प्रमुख असण्याचा उपयोग काय? शिवसेनेचं तुफान कायम आहे. लोकांच्या मनात, हृदयात कायम आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचं तुफान येईल असे उध्दव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले, यापूर्वी अनेकांनी म्हटलंय की शिवसेना निवडणुकीनंतर राहणार की नाही? पण मुंबईकर आता एकत्र आले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहताहेत. त्यामुळं माझंही मत आहे की मुंबई पालिकेच्याच नव्हे तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.