शाहू महाराज रुग्णालयास ‘मल्टिस्पेशालिटी’चा दर्जा; विविध आरोग्य योजनांमधून होणार मोफत उपचार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा मिळाला आहे. या रुग्णालयात आता जिल्हाभरातील रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना या योजनांमधून चांगल्या दर्जाचे मोफत उपचार करू शकणार आहेत. हॉस्पिटलमध्ये या सर्व सेवा सुरू झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टतर्फे छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. अनुभवी डॉक्टर, कर्मचाऱ्यासह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, मशिनरी, तपासण्या आणि शस्त्रक्रिया एकाच छताखाली सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आधी कोविड हॉस्पिटल म्हणून हे रुग्णालय ताब्यात घेतले. शाहू महाराज रुग्णालयास ‘मल्टिस्पेशालिटी’चा दर्जाहोते; परंतु अन्य आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत असल्याने १५ जूनपासून पुन्हा हे हॉस्पिटल कोविड ऐवजी सामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये डायलेसिस, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आयसीयू, मदर मिल्क बँकेची सुविधा देण्यात आली आहे. स्वतंत्र स्त्रीरोग विभाग, नाक-कान-घसा विभाग, अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, जनरल मेडिसीन, अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.

शासनाने मान्यता दिल्याने आता शासकीय कर्मचारी देखील या रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटलच्या मान्यतेशिवाय उपचार घेऊ शकणार आहेत. रोज ओपीडी संपल्यानंतर दुपारी २ वाजेनंतर हॉस्पिटलमध्ये अवघ्या ५ मिनिटात सॉप्टवेअरद्वारे केवळ एक्सरेच्या माध्यमातून अवघ्या अडीचशे रुपयांमध्ये कोरोनाची टेस्ट केली जात असल्याचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी सांगितले. ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. अर्जुन साठे, संतोष नवगाळे, चंदन अत्तरदे उपस्थित होते.

Protected Content