जळगाव प्रतिनिधी । कोरोनावर नियंत्रणासाठी निर्देश दिलेलया कर्तव्यामध्ये कसुर केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, याप्रसंगी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलभ रोहण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांचेसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा लागू करण्यात आला आहे. अशावेळी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जे कोणी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल. नोटीस दिलेल्या कर्मचार्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे. अन्यथा त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. त्याचबरोबर काम करणार्या कर्मचार्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करणार्या आंगणवाडी सेविका, अशावर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर आरोग्य विभागाने तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. याकरीता महिला बचतगटांनी तयार केलेले मास्क खरेदी करावे. तसेच निवारागृहातील नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची तपासणी संबंधित नोडल अधिकारी यांनी करावी. नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही याकरीता जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.