जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील सामुदायिक वनाधिकार प्राप्त गावांमधील वनव्यवस्थापन व संवर्धन कृती आराखडे तयार करणे संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वन हक्क जिल्हा कनव्हर्जन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपवनसंरक्षक श्री. होशिंगे, निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील , उपजिल्हाधिकारी प्रसाद मते आदी अधिकारी तसेच लोकसंघर्ष मोर्च्यांच्या प्रतिभा शिंदे , सचिन धांडे, लोकसमन्वय प्रतिष्ठाणचे संजय महाजन सहभागी झाले होते.
वनहक्क कायदा 2008 नुसार सामूहिक वन हक्क प्रदान करण्यात आलेल्या गावांमध्ये गावांना मिळालेल्या सामूहिक वन क्षेत्राचे व्यवस्थापन व संवर्धन करण्यासाठी त्यांचे कृती आराखडे बनवण्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठाण ही संस्था कार्यरत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या 18 गावांमध्ये गांवसमित्या तयार करून कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या बाबतीत प्रतिभा शिंदे यांनी मांडणी केली. यावेळी यावल अभयारण्य क्षेत्रातील गावे तसेच चोपडा परिसरातील आदिवासी गावांमध्ये वनसंवर्धन व त्यातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल. ज्यातून या गावांमध्ये लोकांची उपजीविका व जीवनमान उंचावता येईल म्हणून या कृती आराखड्यात सर्व विभागांच्या योजनांचा समन्वय करून गावाची विकास कामे करता येतील. तसेच स्थानिक नैसर्गिक संसाधनांचे रक्षण व संवर्धन ही होईल असे सांगत सर्व विभागांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही प्रक्रिया लोकांसाठी महत्वपूर्ण असल्याने सर्व शासकीय यंत्रणेने आपापल्या विभागांच्या योजनांच्या समन्वयातुन आपण या भागात नाविन्य पूर्ण कार्यक्रम राबवून चांगल्या पद्धतीने योजना राबवू या व त्यासाठी पुढील बैठकीत सर्व विभाग आणि गाव व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबैठकीला प्रकाश बारेला, ताराचंद पावरा, इरफान तडवी आदी उपस्थित होते.