जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात कोरोना महामारीमुळे बंद असलेला पोषण पुनर्वसन विभाग हा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. याठिकाणी कुपोषित बालकांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे यासह डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते.
जिल्हयातील कुपोषित बालकांचे आहार आणि औषोधपचाराने पुनर्वसन करण्यात येत आहेत. रुग्णालयात बाल रोग व चिकित्सा विभागात ५ खाटांचा हा विभाग असून जिल्हृयातील कुपोषित बालकांसाठीचे हे केंद्र आहे. कोरोना महामारीच्या काळात हे केंद्र बंद होते. हे केंद्र आता सुरु करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, जिल्हृयात कुपोषित बालकांचा प्रश्न मोठा आहे. त्या तुलनेत रुग्णालयात साधन सामुग्री नसली तरी आपल्याकडे आत्मविश्वास अधिक आहे. या केंद्राच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून कर्मचारी भरतीसाठी जिल्हाधिका-यांकडे चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाहीसुध्दा डॉ.रामानंद यांनी दिली.
प्रारंभी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बालरोग व चिकित्सा विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोशे, पोषण पुनर्वसन केंद्राचे डॉ.एस.जी.बडगुजर, डॉ.एस.एस.बन्सी, इन्चार्ज सिस्टर निर्मला सुरवाडे, संगिता सावळे, काळजीवाहक उमा सावकारे, नयना चावरे आदी कर्मचारी उपस्थित होते.