एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय कार्यालय तथा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हे वेळेवर यावे व वेळेवर जावे, यासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धतीने उपस्थितीची नोंद करावी असा आदेश आहे. परंतु तालुक्यातील बहुसंख्य शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे बायोमेट्रिक हजेरी यंत्र यंत्र बंद अवस्थेत व खराब झाल्याचे कारण समोर येत आहे.
तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायती असून यातील बहुसंख्य कार्यालयात बायोमेट्रिक यंत्र नाहीत किंवा खराब झाले असल्याचे आढळून आले आहे. तसेच तालुक्यातील एकूण १६ ते १७ शासकीय कार्यालय असून यातील असंख्य बायोमेट्रिक यंत्र खराब झालेले असल्याचे आढळून आले आहे. शासनाने सदर साहित्यासाठी हजारो रुपये सदर कार्यालयांना पुरवले असताना शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होताना दिसत आहे, तसेच बायोमेट्रिक यंत्र खराब किंवा बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत आहे. त्यांना पटेल त्यावेळेस ते कार्यालयात हजर असतात व त्यांना वाटेल त्यावेळेस कार्यालयातून निघून जाताना आढळून येत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या चुराडा होत असुन जनतेचे देखील हाल होत आहेत. कर्मचारी वेळेवर हजर नसतात. बहुतेक सर्वच शासकीय कार्यालय एरंडोल शहरात असून परिसरातील एकूण ६५ गावातील हजारो नागरिक दररोज आपली शासकीय कामे करण्यासाठी शहरात येत असतात परंतु त्यांना तासंतास कर्मचाऱ्यांची वाट पाहण्यात ताटकळत राहावे लागते तसेच काही नागरिक आपली दिवसभराचे कामे आपटून संध्याकाळी कार्यालयात कामानिमित्त आले असतात त्यांना संबंधित कर्मचारी वेळेच्या आधीच निघून गेलेला असतो. त्यामुळे त्यांना सदर कार्यालयात वारंवार घिरट्या घालाव्या लागतात. यामुळे असंख्य नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. तरी संबंधितांनी या बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सर्व कार्यालयांना अद्यावत करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.