मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील रुईखेडा येथे नुकतीच शेती तंत्रज्ञान साक्षरता व जैविक कीड व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी मा. चंद्रशेखर रामभाऊ बढे यांची उपस्थिती लाभली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेती तंत्रज्ञान साक्षरता व जैविक कीड व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा तालुक्यातील रुईखेडा येथे 31 मे 2023 रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन मा. प्रा.डॉ.आशुतोष पाटील (संचालक-आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. डॉ. सी. एस. चौधरी यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी मा. चंद्रशेखर रामभाऊ बढे तसेच शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील प्रा. डॉ. सागर बंड उपस्थित होते. तसेच कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच कार्य करीत नसून विद्यार्थी, पालक आणि समाजातील नागरिक यांच्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे. त्या माध्यमातून नागरिकांनी कुटुंब, समाज व राष्ट्राची उन्नती साधावी असे आवाहन केले. प्रमुख अतिथी मा. डॉ. सी. एस. चौधरी यांनी विद्यापीठाने व खडसे महाविद्यालयाने राबवलेली शेतीविषयक कार्यशाळा ही दिशादर्शक असून शेतकरी बंधू-भगिनीने शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसनशील भारत देशाला विकसित बनवण्यासाठी हातभार लावावा असा मानस व्यक्त केला.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. चंद्रशेखर बढे यांनी आधुनिक काळातील शेतकरी अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वारेमापपणे वापर करून सुपीक जमिनी नापीक करत आहेत, त्यामुळे मृदेचा ऱ्हास होत आहे, परिणामी जमिनीचे वाळवंटीकरण वाढत चालले आहे. म्हणून मृदेच्या संधारण व संवर्धनासाठी आणि शाश्वत विकासासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. तसेच शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांचे विवेचन करून शेतकरी बंधू भगिनींच्या मनातील प्रश्नाला उत्तरे देऊन मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर प्रा. डॉ.सागर बंड यांनी निसर्गातील अन्नसाखळी व अन्नजाळी ही जैविक कीड व्यवस्थापनात महत्त्वाचे कार्य करित असते, परंतु मानव हा स्वतःच्या तात्कालीक स्वार्थासाठी निसर्गातील अन्नसाखळी आणि अन्नजाळीचा संहार करीत आहे, त्यामुळे जैविक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन पिकाची नासाडी होत आहे, परिणामी शेतकरी दारिद्र्याच्या विळख्यात अडकत चालला आहे, म्हणून शेतकरी बंधू-भगिनींने जैविक कीड रोखण्यासाठी कृषी विद्यापीठातील प्रतिबंधक औषधे वापरून तसेच सेंद्रिय शेतीचा अवलंब करून मृदेचे व पिकांचे संगोपन केले पाहिजे. असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी कार्यशाळेला मिळालेल्या परवानगी बद्दल विदयापीठाचे आभार मानले तसेच विद्यापीठाची आणि महाविद्यालयाची ध्येय-धोरणे तळागाळातील विद्यार्थी, पालक व सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबंध राहू असे आश्वासन दिले.
मा.आमदार एकनाथराव खडसे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. माहेश्वरी, प्र-कुलगुरू व प्रा. इंगळे यांनी तसेच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. अ़ॅड. रोहिणीता़ई खडसे-खेवलकर यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कार्यशाळेचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील व कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.अतुल बढे यांनी केले. या कार्यशाळेला रुईखेडा परिसरातील सुमारे ९८शेतकरी बंधू-भगिनी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक बावस्कर, प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. अतुल बढे यांनी तर महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी आभार मानले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी कार्यशाळेच्या नियोजनात सहकार्य केले.