अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील राजश्री शाहू महाराज प्राथमिक विद्यामंदिर येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काही कारण नसताना ७ जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नरेंद्र हिम्मतराव अहिरराव (वय-४४) रा. तांबापुरा, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते राजश्री शाहू महाराज प्राथमिक विद्यामंदिर येथे गेल्या १९ वर्षांपासून नोकरीला आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास काही कारण नसताना चंद्रकांत मुरलीधर नेतकर, रत्नमाला शालिग्राम सोनवणे, राजेंद्र छोटू शिरसाट, संगीता प्रवीण पाटील, कुणाल राजेंद्र शिरसाट, भैया आबा शिरसाट, सुलोचना राजेंद्र शिरसाठ सर्व रा. अमळनेर यांनी शाळेत येऊन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यातील एकाने काठीने बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १८ हजार २०० रुपये काढून घेतले, तसेच लोखंडी फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर नरेंद्र अहिरराव यांनी रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.