जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड यादी शिक्षण संचालक कार्यालयाकडून आज जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी बुधवार ७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीत राज्य स्तरावर लॉटरी काढण्यात आली. लॉटरीत जिल्ह्यातील २८७ शाळांमध्ये ३ हजार ६५ जागांकरिता २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड यादी तसेच १ हजार ९६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी शिक्षण संचालक कार्यालयाकडून आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एस.एम.एस.द्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी व प्रवेशाकरिता दिनांक देण्यासाठी पडताळणी समितीकडून एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येणार आहे. तथापि एस.एम.एस. वर अवलंबून न राहता वेबसाईटवरून खात्री करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले आहे.