जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम एकीकडे दुचाकीवर डबल सीट जाणाऱ्यांवर कारवाई करीत असल्याचे चित्र असताना त्यांच्याच शेजारी पोलीस कर्मचारी व नागरिकांचा १५-२० जणांचा घोळका सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे पहावयास मिळाले. इतकंच नव्हे तर पोलीस निरीक्षक वृद्ध रुग्णांसोबत अपमानास्पद भाषेचा उपयोग करताना दिसून आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी संचारबंदी लागू करून नागरिकांसाठी नियमावली आखून दिली आहे. जळगावात पोलीस प्रशासनाकडून कारवाई करताना काही ठिकाणी दुजाभाव केला जात आहे तर काही ठिकाणी अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
टॉवर चौकात पोलिसांची मांदियाळी
टॉवर चौकात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह २०-२५ कर्मचाऱ्यांची मंदियाळीच नागरिकांना शिस्त लावण्यासाठी भरलेली असते. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी स्वतःच सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवून निरीक्षक आणि कर्मचारी उभे असताना नागरिकांना नियम शिकवतात. अनेकांच्या चेहऱ्याला मास्क देखील नसतो.
रातोरात सोडली जातात वाहने
शहर पोलिसांकडून अनेक वाहने दिवसा कारवाई करून जप्त केली जातात परंतु सायंकाळ झाल्यानंतर ओळख परिचय पाहून सोडण्यात येतात.
वृद्धांसोबत अरेरावीची भाषा
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम हे टॉवर चौकात स्वतः लक्ष घालून नागरिकांवर कारवाई करतात. कारवाई करताना वृद्ध किंवा रुग्ण दुचाकीवर दोघे जात असतील तर ते त्यांच्याशी अरेरावीने बोलतात. इतकच नव्हे तर त्यांना अपमानास्पद वाटेल अशा भाषेचा देखील ते प्रयोग करतात.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेसाठी दुचाकीवर बाहेर पडताना एकट्यानेच जावे असे नमूद करण्यात आले आहे. रिक्षा आणि इतर वाहने बंद असल्याने एखाद्या आजारी व्यक्तीला रुग्णालयात जायचे असल्यास तो एकट्याने दुचाकीवर कसा जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्यांकडे चारचाकी नसल्याने ते दुचाकीचा मार्ग अवलंबतात त्यात पोलीस आदेशाचा धाक दाखवून कारवाई करीत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.