जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना मार्केट, शॉपिंगमॉल, बिअर बार, हॉटेलमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. यावर प्रतिबंधक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवार दि. १७ फेब्रुवारी रोजी महापालिकेत व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांत वाढ होत असतांना शासनाद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेले नियम नागरिक पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मार्केट परिसर, हॉटेल, शॉपिंग मॉल व इतर व्यापारी प्रतिष्ठानांवर नागरिकांची गर्दी होत आहे. यावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रतिबंधक उपाय योजनांंबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात बुधवार दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस शहरातील सर्व मार्केट असोसिएशन, बिअर बार, शॉपिंग मॉल, हॉटेल व्यावसायिक , सिनेमा थिएटर असोसिएशन यांचे पदाधिकारी, सचिव व प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.