जळगाव, प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांवर लॉकडाऊन काळात भरत असलेल्या बाजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत होता. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून दररोज कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी गुरुवारी मनपा आयुक्तांना शहरातील रस्त्यांवर भाजीपाला विक्रीस बंदी घालून, केवळ मोकळ्या मैदानावर व्यवसाय करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार शुक्रवारी मनपा आयुक्त व महापौरांच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, शहरातील ठराविक जागेवर आता सोशल डिस्टन्स ठेवून भाजीपाला बाजार भरविला जाणार आहे.
शुक्रवारी दुपारी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर भारती सोनवणे, उपायुक्त अजित मुठे, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत आदी उपस्थित होते. नियमीत बाजार भरणाऱ्या बळीराम पेठ, गणेश कॉलनी चौक, पिंप्राळा, महाबळ चौक, ख्वॉजामिया चौक ऐवजी जुनी नगरपालिका, साने गुरुजी रुग्णालय, जी.एस.ग्राऊंड, सागर पार्क, लक्झरी स्टँडचे मैदान, स्मशान भूमीसमोरील बालाजी मंदिराची जागा, मानराज पार्क समोरील मोकळे मैदान, रामदास कॉलनीमधील मोकळे मैदान, मनियार ग्राऊंड तसेच मनपा मालकीच्या मोकाट जागांवर आता भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
सोशल डिस्टन्स पाळावा लागणार
नवीन ठरविलेल्या जागी व्यवसाय करत असताना विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागणार आहे. तसेच ग्राहकांसाठीही पाच पाच फुटाचे अंतर सोडावे लागणार आहे. तसेच प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी मनपा कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी सॅनेटाझरच्या फवारणीचे प्रवेशव्दार बसविण्यात यावे यासाठीचेही आवाहन केले जाणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.