मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वरील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे. दरम्यान, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. या दोन्ही सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहे. हे दोन्ही सुरक्षारक्षक पवारांच्या बंगल्यावरच सुरक्षेचे काम करतात. त्यांचा पवारांशी थेट संबंध येत नाही. तरीही शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं समजते.