मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले असताना या भेटीबाबत प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही.” अशी माहिती नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे.
“प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे? याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
“देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची शरद पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते, मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपाच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल.”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी तर तमिळनाडूतील द्रमुकच्या विजयात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. २०१४ मधील मोदी यांचा विजय किंवा विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांचे आडाखे आणि नियोजन उपयोगी पडले होते. राज्य विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला सल्ला दिला होता आणि आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती.