चोपडा प्रतिनिधी। येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे प्रियजन स्मृती व्याख्यानमालेत सादर करण्यात आलेल्या शब्द सुरांच्या अनोख्या मैफलीने चोपडेकरांना एक अनुभव आनंदानुभुतीचा प्रत्यय दिला. या शब्द सुरांच्या मैफिलीत चोपडेकर रसिक चिंब भिजले.
यावेळी मंचावर मसाप शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, प्रमुख अतिथी डॉ. प्रेमचंद महाजन, डॉ. महेंद्र जयस्वाल, डॉ. मनोज पाटील, कार्यक्रमाचे प्रायोजक सौ. राजश्री सोनवणे, महेश शर्मा, डॉ. राहुल पाटील यांच्यासह पत्रकार तुषार सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार लोहार यांनी तर आभार प्रदर्शन संजय सोनवणे यांनी केले.
मनोज चित्रकथी यांनी सुमधुर आवाजात सादर केलेल्या ‘घनश्याम सुंदरा…’ या भूपाळी ने सुरू झालेल्या या माय मराठी शब्द सुरांच्या मैफलीमध्ये म सा प सदस्य आणि मनोज चित्रकथी यांच्या समूहाने गाणी, कविता, किस्से आणि प्रसंग सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या शब्द सुरांच्या मैफलीमध्ये गौरव महाले यांनी विद्यमान परिस्थितीवर भाष्य करणारी ग दि माडगूळकरांची ‘परगती’ व डॉ. शैलेश वडेवार यांची ‘वायरस’ ही आधुनिक तंत्रज्ञान व परिभाषाने मानवी जीवन कसे व्यापले आहे हा आशय स्पष्ट करणारी कविता उत्तमरित्या सादर करून टाळ्या मिळवल्या. विलास पं. पाटील यांनी प्रशांत असनारे यांची ‘माझी मुलगी पावसाचे चित्र काढते…’ व कवी नलेश पाटील ‘कुणी पुसल्या हिरव्या जागा…’ या आशयगर्भ रचना सादर करून रसिकांना विचार करायला अंतर्मुख व्हायला भाग पाडले. संजय बारी यांनी ग. दि. माडगूळकर यांची ‘काव्याची किंमत’ ही थोडीशी शृंगारिक आणि कवीची कैफीयत मांडणारी कविता तसेच गुरु ठाकूर यांची माय मराठीचा गोडवा गाणारी ‘अलवार कधी,तलवार कधी…’ ही रचना प्रभावीपणे सादर करून रसिकांची दाद मिळवली. सौ. योगिता पाटील यांनी फ. मु. शिंदे यांची आई व ‘पैठणी’ ही शांता शेळके रचीत स्त्री जीवनाचे पदर उलगडणाऱ्या रचना सादर करून वाहवा मिळवली. मसाप चोपडा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे यांनी स्वरचित ‘खरं खूरं जगण्याचे आता तांबडं फुटेल’ आणि
‘चूल’ या रचना सादर करून स्त्रियांचे विश्व प्रभावी शब्दात उलगडले व उपस्थितांची दाद मिळवली.
मनोज चित्रकथी यांनी ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती…, गाता गाता जाईन मी माझे जीवन गाणे…., मी किनारे सरकताना पाहिले…, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…., ने मजसी ने परत मातृभूमीला…’ ही गाणी आपल्या दमदार आवाजात सादर करून टाळ्या मिळवल्या. तर विवेक बाविस्कर या युवा कलावंताने ‘आधी रचिली पंढरी…, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…, माझे माहेर पंढरी…, नांदी, प्रथम तुज पाहता…’ ही गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. प्रदीप कोळी यांनी ‘गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा, येई वो विठ्ठले भक्तजन वत्सले’ या गीतांमधून तान आणि आलाप घेऊन कार्यक्रम एका उंचीवर नेला. ए. पी. पाटील या सेवा निवृत्त शिक्षकांनी ‘माझी भाषा माझी आई’ ही इ. ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता अप्रतिम सादर केली. योगेश चौधरी यांनी खड्या आवाजात ‘विश्वनाट्य, सूत्रधार तूच शाम सुंदरा, माझी मैना गावाकडं राहिली…’ ही गीते सादर करून उपस्थितांना मनमुराद रिझवले. या गायनवृंदला साथसंगत तबला – नरेंद्र भावे, विजय पालीवाल, हार्मोनियम- मनोज चित्रकथी, बासरी – भागवत जाधव, गिटार – स्वप्निल ठाकुर
सिंथेसायझर- विवेक बाविस्कर यांनी केली. मैफिलीचेेे मैफिलीचे संचालन संजय बारी व योगेश चौधरी यांनी केले मसाप ने सादर केलेला हा प्रयोग चोपडेकर रसिकांना खूपच भावला.