जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटल समोरून शतपावली करत असतांना एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत दुचाकीवरील अज्ञात दोन जणांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, रिंगरोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथे ज्योती विजय शिरसाठ (वय-३८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमी नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी शुक्रवारी २६ मे रोजी रात्री १० वाजता पायी निघाले. त्यावेळी नंदनवन कॉलनी येथील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरी हिसकावून लांबविण्याची घटना घडली. त्यांनी आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने शनिवारी २७ मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात २ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.