जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातून सायंकाळी शतपावली करणाऱ्या महिलेचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने मागून येवून धुमस्टाईल लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रिंगरोड परिसरात राहाणाऱ्या डॉ. नेहा राजेश सादरीया (वय-३४) रा. हरेश्वर नगर, रिंगरोड ह्या फॅमिली डॉक्टर आहेत. क्लिनीक बंद झाल्यानंतर त्या आपल्या पतीसह शतपावली करतात. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास डॉ. सादरीया ह्या एकट्याच शतपावली करण्यासाठी रिंगरोड वरून आकाशवाणी कडे जात होत्या. जैन पेट्रोल पंपाजवळील हॉटेल स्टेप इन जवळून जात असतांना त्यांना पर्समधून आपला मोबाईल काढला. नंबर डायल करत असतांना अचानक अज्ञात दोन चोरटे दुचाकीने मागून येवून त्यांच्या हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून काही कळण्याच्या आत भामटे दुचाकीने स्वातंत्र्यचौकाकडे पसार झाले. महिनाभरापूर्वीच डॉ. नेहा यांनी नवीन मोबाईल खरेदी केला होता.
याप्रकरणी डॉ. नेहा यांनी रविवारी सकाळी पतींसह तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. या तक्रारीवरुन 10 हजार रुपये किमतींचा मोबाईल लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.
गेल्या दिवसात ही दुसरी घटना घडली होती. याच पध्दतीने जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी १० वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीत शतपावली करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल अज्ञात दोघांनी लांबविला होता. ही घटना ताजी असतांना शनीवारी ही दुसरी घटना घडली आहे.