जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध व्यापारी संकुलांमधील दुकाने सुरू व्हावे म्हणून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे धारकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांना साकडे घातले असून यातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या हळूहळू अनलॉक होत असले तरी व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. शहरात महात्मा फुले, गोलाणी आदी मोठ्या संकुलांमधील हजारो दुकानदारांवर यामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमिवर, आज राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळेधारकांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. आज जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मार्केट्स काही अटी शर्ती टाकून उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान, अभिषेक पाटील यांनी नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. तसेच याबाबत मुख्य सचिव यांच्या कडून नवीन निर्देश पत्र काढून पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. या वेळी अभिषेक पाटील यांच्या सोबत फुले मार्केटचे रमेश मतानी, मनोहर नाथानी, संत कवर राम मार्केटचे शंकर तलरेजा, महेश तलरेजा अमित जळण व सेंट्रल फुले मार्केटचे दीपक मंधान तसेच, डॉ रिजवान खाटीक उपस्थित होते.