व्यसनमुक्तीची वारी, आपल्या दारी

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील चेतना व्यसनमुक्ती उपचार व समुपदेशन केंद्रातर्फे जळगाव ते सेवाग्राम अशी विशेष रॅली महात्मा गांधी यांची जयंतीदिवशी २ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. “व्यसनमुक्तीची वारी, आपल्या दारी” या घोषवाक्यद्वारा रॅलीच्या मार्गातील अनेक गावात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्ती रथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात येणार आहे.

चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांच्या संकल्पनेतून हि रॅली निघत आहे. २ ते ८ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त पार्श्वभूमीवरदेखील याचे आयोजन आहे. एका वाहनात व्यसनमुक्तीविषयी असलेले स्लोगन लावून ती चित्ररथाद्वारे सजवून आकर्षित करण्यात येणार आहे. व्यसन हा एक मानसिक आजार आहे, तो बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास रॅलीतून दिला जाणार आहे.

शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता हिरवी झेंडी दाखवून व्यसनमुक्तीविषयक रॅली निघणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्रवीण पाटील यांची उपस्थिती राहील. जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ मार्गे वर्धा, सेवाग्राम येथे समारोप होणार आहे. विदर्भातील या मार्गावरील अनेक गावे व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे व्यसनाचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक नुकसान होते. त्याविषयी जनजागृती केली जाईल. प्रत्येक घटकाची भूमिका काय राहील ते सांगितले जाणार आहे.

Protected Content