चोपडा प्रतिनिधी । येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्यापीठस्तरीय श्रमसंस्कार व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, मार्गदर्शक डॉ.ज्ञानेश्वर कांबळे (प्रताप महा.अमळनेर), मार्गदर्शक डॉ.सुनील वाघमारे, डी.एस.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राप्रसंगी डी.एस.पाटील हे विद्यार्थ्यांना ‘सोफ्ट स्कील’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्याही विषयाचे मूळ ज्ञान, समस्या हाताळण्याचे कौशल्य, स्वताला ओळखण्याची हातोटी, ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये काम करण्याची मानसिकता, वेळेचे व्यवस्थापन,एकत्रितपणे काम करण्याची तयारी, आपले मत मांडण्याची कला, कमीत कमी बोलून जास्त ऐकण्याची क्षमता, समस्येला संधीत रुपांतरीत करणे या गोष्टी आवश्यक असणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, मार्गदर्शक डॉ.ज्ञानेश्वर कांबळे (प्रताप महा.अमळनेर), मार्गदर्शक डॉ.सुनील वाघमारे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ.सौ.पी.एम.रावतोळे यांनी करून दिला. या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.ज्ञानेश्वर कांबळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, साहित्यिकाकडे माणसाला लेखणीच्या माध्यमातून बदलण्याची क्षमता असते. साहित्यिक निरीक्षणाने समाजाचे प्रतिबिंब रेखाटतो. दुसऱ्याचे बरे व्हावे अशी आपल्यामध्ये मानसिकता निर्माण करण्यासाठी उत्तम साहित्याचे वाचन करायला हवे. आज दिसण्यापेक्षा असणं महत्वाचे आहे. आपलं असणं घडविण्यासाठी उत्तम भाषिक कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. माणसाने आपल्या बोलण्यावर व शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवे कारण तो व्यक्तिमत्वाचा भाग आहे. उत्तम व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी स्वतावर प्रेम करणे, नैराश्य व ताणतणावाचे व्यवस्थापन करणे, स्वताला तपासणे, वाचन, चिंतन व मनन करणे, सर्व प्रकारच्या वातावरणात राहणे आवश्यक आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्राप्रसंगी डॉ.सुनील वाघमारे यांनी ‘बदलते समाज प्रवाह आणि व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेत जगतांना दुसऱ्याच्या अपयशात आपले यश शोधता आले पाहिजे.व्यक्तीच्या आंतरिक व्यक्तिमत्वावर त्याचे यश अपयश अवलंबून असते. विद्यार्थ्यांच्या मधील सुप्तगुण, कौशल्य ओळखून त्याचा विकास करणे गरजेचे आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेने आज्ञाधारक विद्यार्थी घडविले पाहिजेत. व्यक्तिमत्व विकासासाठी सिंहावलोकन करणे व घडणाऱ्या घटनांची चिकित्सा करून जीवन जगण्याचा सुकर मार्ग निवडणे गरजेचे आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या चौथ्या सत्राप्रसंगी डॉ.भरत खंडागळे यांनी ‘कौशल्य विकासातून व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, व्यक्तीने कला, क्रीडा, संगीत, साहित्य, वक्तृत्व, पद, अधिकार, धर्म, वंश, सत्ता व सामाजिक कार्य केल्याने व्यक्तिमत्व विकसित करण्याची उत्तम संधी मिळते. अमर्याद वाढणाऱ्या गरजांच्या या युगात आपण स्वतः जास्त आनंदाच्या शोधात दुख ओढवून घेण्यापेक्षा काय चांगले व काय वाईट याचा विचार करून स्वताला घडविले पाहिजे. त्याचबरोबर स्वताला घडविण्यासाठी स्वताच्या क्षमतांचा वापर केला पाहिजे कारण आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव, एकाग्रतेचा अभाव या गोष्टींमुळे आपण आपल्याला घडविण्यात अपयशी ठरतो.
कार्यशाळेच्या या सत्राचे सूत्रसंचालन डॉ.एन.सी.पाटील यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी व्ही.पी.हौसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.