नवी दिल्ली : वृत्तसंस्था । व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्यास अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी परवानगी दिली आहे.
‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जामीन दिल्याप्रकरणी तनेजा यांनी दोन ट्वीट केले होते. हे ट्वीट न्यायालयाचा अवमान करणारी असल्याची तक्रार विधी शाखेचा विद्यार्थी आदित्य कश्यप यांनी केली होती. त्यावर वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यास परवानगी दिली
रचिता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोन कार्टुन रेखाटले होते. त्यांनी हे कार्टुन सोशल मीडियावर ‘सॅनिटरी पॅनल्स’ नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले होते. हा न्यायालयावर हल्ला आणि न्यायालयीन संस्थेचा अवमान असल्याचं सांगत अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कारवाई करण्यात हिरवा कंदील दिलाय.
यापूर्वी, अॅटर्नी जरनल के के वेणुगोपाल यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधातही कारवाई करण्याची परवानगी दिली होती. ‘आज लोक निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांची निंदा करत आहेत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं त्यांना वाटतं. अन्यायकारक पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्यासाठी शिक्षा भोगण्यासाठी तयार राहायला हवं, अशी वेळ आलीय’ असंही यावेळी वेणुगोपाल यांनी म्हटलं होतं.