जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नागरिकांनी कर भरून देखील साफ सफाई मिळत नसून यातच कोरोना व्हायरसचा धोका जाणवत आहे. शहराला स्वच्छतेची अत्यंत गरज असल्याने महापालिकेने वॉटर ग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यासंदर्भात एक श्वेत पत्रिका काढून विशेष महासभा बोलविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी महापौर भारतीताई सोनवणे व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे इ-मेलद्वारे केली आहे.
निवदेनाचा आशय असा की, वॉटर ग्रेस कंपीनीला शहरातील स्वच्छतेचा ठेका १६ ऑगस्ट २०१९ रोजी देण्यात आला आहे. वर्षाला १५ करोडच्या हिशोबाने ५ वर्षांसाठी ७५ करोडचा ठेका देण्यात आलेला आहे. शहरातील साफ सफाईसाठी आजपर्यत जवळपास ८ करोड ७५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून शहरात स्वच्छता दिसून येत नाही. ठेकेदाराने टाटा छोटा हत्ती, एक साफसफाईचे वाहन, ज्याची क्षमता २ टन आहे त्यात ९ टन भार दाखवून वॉटरग्रेस कंपनीने ते बिल मानपाला दिले आहे. मानपाचे उपायुक्त दंडवते यांचे नातेवाईक या वॉटरग्रेस कंपनीत महत्त्वपूर्ण स्थितीत आहे. दरम्यान, सत्ताधारी व विरोधक एकदुसऱ्यावर या करारामध्ये कंत्राटदाराची लाच / भागीदारी असल्याचा आरोप करत आहे. अश्यात एक ज्येष्ठ पत्रकार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी १.२५ करोड रुपये घेतल्याचा आरोप केला असल्याचे निवदेनात म्हटले आहे. यामुळे वॉटर ग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यासंदर्भात श्वेत पत्रिका काढून विशेष महासभा बोलविण्यात यावी अशी सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे.