वैद्यकीय विद्यार्थी केवळ कोरोना रुग्णसेवेत ; अनुभवाच्या विविधतेपासून वंचित

 

मुंबई : वृत्तसंस्था  ।  गेले वर्षभर भावी डॉक्टर असलेले वैद्यकीय विद्यार्थी केवळ कोरोना रुग्णसेवेत व्यग्र ठेवण्यात आले. इतर आजारांच्या रुग्णसेवेसाठी त्यांची वेगवेगळ्या विभागांत नियुक्ती न केल्यामुळे ते अनुभवाच्या विविधतेपासून वंचित राहिले.

 

याचा परिणाम चिकित्सेच्या इतर शाखांमध्ये प्रावीण्य मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे.

 

अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमधील तासिकांवरही परिणाम झाल्यामुळे डॉक्टर म्हणून पदवी घेतल्यावर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येईल तेव्हा काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय व्यवस्था गेल्या मार्चपासून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी राबत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉक्टर, निवासी डॉक्टर्स, पदव्युत्तरचे विद्यार्थी सर्वच कोरोना रुग्णांच्या सेवेत गुंतले आहेत.

 

‘कोरोना रुग्णसेवेतून विद्यार्थ्यांना अनुभव मिळतोच आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर म्हणून जबाबदारी लक्षात घेऊन आता करोना रुग्णांची सेवा करणे आवश्यकच आहे. त्यांचा काही अभ्यासक्रम बुडला असेल तर तो भरून काढण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतीय वैद्यक परिषदेकडेही विचारणा केली आहे, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सांगितले.

 

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी (दीड वर्ष) विद्यार्थ्यांना नियमित तासिकांबरोबर प्रयोगशाळांमध्ये काम करावे लागते. विच्छेदन करणे, अवयवांची माहिती घेणे याचा अनुभव दिला जातो. यंदा विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षांच्या तासिका ऑनलाइन झाल्या. अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह न मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या आवारात राहणे शक्य झाले नाही. त्यामुळे प्रयोगशाळांतील अनुभव विद्यार्थ्यांना मिळू शकला नाही.

 

दुसऱ्या वर्षांपासून विद्यार्थ्यांची विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाते (क्लिनिकल पोस्टिंग). वरिष्ठ, शिक्षकांबरोबर रुग्ण पाहणे, त्याच्या नोंदी ठेवणे अशी कामे करत विद्यार्थ्यांचे शिक्षण होत असते. केस स्टडीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. दुसऱ्या वर्षांपासूनचा हा शिरस्ता पदवी मिळेपर्यंत कायम असतो. वर्षांगणिक विद्यार्थ्यांना दिला जाणारा अनुभव आणि काठिण्य पातळी वाढत जाते. मात्र, यातील बहुतेक गोष्टी अनेक महाविद्यालयांमध्ये यंदा कागदोपत्रीच झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

 

प्राध्यापक, वरिष्ठ सर्वच जण कोरोना रुग्णसेवेत व्यग्र असल्यामुळे नियमित तासिका झाल्या नाहीत. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला नाही. इंटर्नशिपसाठीही सगळ्या विभागांत दीड ते दोन महिने काम करणे अपेक्षित असते. ग्रामीण भागांतही काम करणे अपेक्षित असते. इंटर्नशिप संपून दीड महिना झाला, तरी बंधपत्रित सेवा देण्यात आलेल्या नाहीत. ‘यंदा आम्हाला कोरोना रुग्णांचे उपचार करताना नव्या गोष्टी शिकता येत आहेत. मात्र, प्रत्यक्षात डॉक्टर म्हणून काम सुरू करू त्या वेळी आम्हाला इतर बाबींचे अनुभव न मिळाल्यास ते अडचणीचे ठरेल,’ असे मत पदवीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

 

पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णचिकित्सा किंवा उपचारांच्या कामात सहभागी करू घेण्यात येत नसले तरी त्यांनाही कोरोना रुग्णसेवेचे, नोंदी ठेवण्याचे काम अनेक ठिकाणी देण्यात आले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनावर याचा परिणाम झाला आहे. त्यांना  अन्य रुग्णांना तपासण्याचा तसेच इतर आजारांवर उपचारांचा अनुभव मिळू शकलेला नाही. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रयोगशाळांमधील शिक्षण थंडावले आहे.

 

Protected Content