नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आमच्या सरकारने लॉकडाउन लागू करणे आणि उठवणे या दोन्ही गोष्टी वेळेवर केल्याने अनेकांचे जीव वाचले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाशी पद्धतशीरपणे लढा देत आहोत. नियोजन करतानाच, साथीची तीव्रता पाहून प्रतिसाद वाढविला. साथ नियंत्रण करताना संपूर्ण समाजाचा विचार केला. वेगाने दिलेल्या प्रतिसादामुळे भारतात कोरोनाचा सर्वदूर प्रसार झाला नाही आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले असे पाहणीतून स्पष्ट झाले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकाने कोरोना रोखण्यासाठी जे धोरण अवलंबले आहे त्यावर टीका केली जात आहे. याला प्रतिउत्तर देतांना मोदी यांनी सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करतांना सांगितले की, उद्योगांना सवलती देण्याची मागणी अनेक तज्ज्ञ आणि वृत्तपत्रे करीत असतानाही आमचा भर असुरक्षित लोकांचे जीव वाचविण्यावर होता. लोकांचे प्राण वाचविण्यावर आम्ही भर दिला. मार्च महिन्यातच तज्ज्ञांनी कोरोनाच्या रुग्णांच्या प्रचंड मोठ्या संख्येचे भाकीत केले होते. आता सध्याची रुग्णसंख्या पाहा. सरकारला दोष देता यावा यासाठी, कोरोनाविरुद्ध लोकांनी जो लढा दिला त्यांना श्रेय देण्याचे टीकाकार नाकारत आहेत.
दुर्लक्षित घटकांना अल्पावधीत मदत पोचविताना कल्याणकारी वितरण यंत्रणा परिणामकारक ठरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘यापूर्वी अगदी छोट्या स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीतही गरिबांपर्यंत मदत पोचत नव्हती आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार होत होता. मात्र, आता आम्हाला अल्पावधीतच प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांना भ्रष्टाचाराची एकही तक्रार न येता मदत पुरविणे शक्य झाले आहे.’