रावेर प्रतिनिधी । आदिवासी विभागात भरती असल्याची वेबसाईटवरून जाहिरात देणार्या तालुक्यातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावे बोगस संकेतस्थळावर राज्यात विविध पदांसाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली होती. संशयिताने बोगस संकेतस्थळावर आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाचे चिन्ह हुबेहुब वापरल्याने ही जाहिरात खरी असल्याचे भासत होते. मात्र विभागात अशा प्रकारे भरती नसल्याने आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते. सहआयुक्त अविनाश चव्हाण यांनी याबाबत सायबर पोलिसांत तक्रार दिली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बेरोजगारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तंत्रविश्लेषण विभागाच्या मदतीने माग काढला. तो जळगावमध्ये असल्याची माहिती मिळाली असता पथकाने जळगाव येथे जितेंद्र रामा तायडे (रा. पुरी बलवाडी, ता. रावेर) या संशयिताला अटक करण्यात आली आहे. निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरिक्षक दानिश मन्सुरी यांच्या पथकाने उपआयुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. संशयिताकडून लॅपटॉप, मोबाईल, सीम कार्ड जप्त केले आहे.