जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील पेट्रोल पंपाजवळ पोलीस गांजा चेक करत असल्याची बतावणी करून एकाने वृध्दाच्या जवळील १८ हजार रुपयांची रोकड आणि १० हजाराची सोन्याची अंगठी असा एकुण २८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रघुनाथ बाबुराव अंबुसकर (वय-६३) रा.पिंप्राळा, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते शहरातील ओम डिस्ट्रीब्युटर्स येथे सेल्समन म्हणून काम करतात. १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील जैन पेट्रोल पंपासमोरून पायी जात होते. त्यावेळी त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला, तो म्हणाला की, आकाशवाणी चौकात पोलीस आहे. पोलीस हे गांजा चेक करून कारवाई करत आहे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून जवळील १८ हजार रुपयांची रोकड आणि त्यांच्या हातातील १० हजाराची ५ ग्रॅमची अंगठी असा एकुण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोबारा केला. दरम्यान, आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर रघुनाथ आंबुसकर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.