मुंबई / नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एकीकडे राज्यात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. या वीज टंचाईसह भारनियमनामुळे सर्वसामान्य त्रस्त असतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांच्या सभांमध्ये राजरोसपणे वीजचोरी केली जात आहे. त्यामुळे महावितरण कोणावर कारवाई करून गुन्हा दाखल करणार याची चर्चा सुरु आहे.
राज्यात कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धतेत तफावत निर्माण झाल्याने वीज टंचाईवर मात म्हणून परराज्यातून तसेच अन्य ठिकाणहून वीज खरेदी केली जात आहे.अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरु आहे. आधीच वाढलेले तापमान त्यात लोडशेडिंगमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर शहरात चोरीच्या विजेतूनच खा. संजय राऊत यांची गुरुवारी सभा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे महावितरण या वीज चोरी प्रकरणी कोणावर कारवाई करून गुन्हा दाखल करणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
खा. राऊत यांच्या सभेच्या ठिकाणी थेट महावितरणच्या वीज वाहिनीवरून विद्युत रोषणाईसह अन्य आवश्यक गोष्टींसाठी आकडे टाकून चोरट्या पद्धतीने वीज घेण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात सभास्थळाच्या मागे गजानन महाराजांचे मंदिर संचालकांच्या परवानगीने वीज पुरवठा घेण्यात आला. असल्याचे पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे. तर या प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून अहवाल आल्यानंतर यात दोषीवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.