वीज चोरीमुळे मानेगावकरांच्या पाणी पुरवठ्यात अडथळा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मानेगाव येथील पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीवरील अवैध वीज जोडणीमुळे ग्रामस्थांना पाणी मिळण्यात अडचणी येत असून याच्या विरोधात महावितरणला निवेदन देण्यात आले.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे कडाक्याच्या उन्हाळ्यात खंडीत पाणी पुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीला स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. या विहिरीवर काही जणांनी वीज चोरी करून स्वत:च्या मोटारी लावल्या असल्याने मानेगावकरांना पाणी मिळण्यात अडचणी होत आहे. यामुळे येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी  महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

 

या निवेदनात म्हटले आहे की, मौजे मानेगाव येथील पाणी पुरवठा करणार्‍या स्मशानभूमी जवळच्या विहिरीत दहा ते बारा अवैध विद्युत पंप टाकण्यात आले असून यासाठी वीज चोरी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळण्यात अडचणी येत असून या समस्येचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 

ग्रामस्थांनी सदर निवेदन दिल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता ब्रजेश कुमार गुप्ता यांनी  संबंधीतांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिले

Protected Content