बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईलक्ट्रिक डीपी नादुरूस्त असल्याने हैराण होवून संतप्त शेतकऱ्यांनी बुलडाणा येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान डीपी दुरूस्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतु जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही. १५ दिवस, महिना – महिना रोहित्र मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सदर समस्या पाहता संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थेट महावितरणच्या मेन्टेनन्स विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरू केले आहे.
महिना-महिनाभर रोहित्रच मिळत नाहीत तर पिकांना पाणी कधी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत आता येथून हटणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली असून मेंटेनन्स विभागात त्यांनी ठाण मांडत मुक्काम आंदोलन सुरु केले आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रविकांत तुपकरांचे तेथेच तळ ठोकून होते तर विविध गावातील शेतकरी देखील त्यांच्यासोबत ठिय्या मांडून आहेत. याबाबत माहिती घेतली असता त्यांनी ऑईल पाठविले असे ते सांगतात तर ऑईल मिळालेच नाही, असे येथील अधिकारी सांगत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच खरीपात पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आणि रब्बीतही विद्युत रोहित्र नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.