मुंबई/ ठाणे: वृत्तसंस्था । मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे.
विहंग यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते.
ईडीने आज प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. ईडीच्या पथकात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांची झाडाझडती घेतली. ‘टॉप्स सेक्युरिटी ग्रुप’शी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. यूकेहून आलेल्या रकमेचा हवालासारखा वापर झाल्याचा संशय आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईला घेऊन जाण्याची शक्यता होती. पण ईडीचे अधिकारी वसंत लॉन्स येथील सरनाईक यांच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेल्याचे कळते.
सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे, असे ईडीने स्पष्ट केले आहे. केवळ धागेदोरे हाती लागल्याने हे सर्च ऑपरेशन राबवले आहे, असे सांगण्यात येत आहे.