चाळीसगाव, प्रतिनिधी | कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेविकांनी आपली सेवा बजावली. त्या कोरोना योध्दांना प्रोत्साहित करण्यासाठी विशाल भाऊ कारडा मित्रपरिवाराच्या वतीने आज त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. अशा भयावह स्थितीत स्वत:च्या आरोग्याचा विचार न करता आरोग्य सेविकांनी आपली सेवा बजावली. त्या कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशाल भाऊ कारडा मित्रपरिवाराच्या वतीने आज नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषदेतील आरोग्य सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा खैरनार, नामदेव पाटील, आदी परिचारिका मोनिका पाडवी, मणिषा पवार, आरोग्य सेविका कल्पना मराठे, अश्विनी महाले, विजया टकले, पुष्पा शेजवलकर, माया जाधव व आशा वर्कर आदींना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्हाला हि सेवा योग्य प्रकारे देता आल्याचे प्रतिपादन परिचारिकांनी केले. दरम्यान समाजसेवक विशाल कारडा हे विविध सामाजिक उपक्रमांतून नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी कोरोनाच्या काळात रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लसीकरण शिबिराचे आयोजन केले. त्यात हजारो रूग्णांनी लस टोचून घेतली. तसेच ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ४ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पक्ष व विशाल भाऊ कारडा मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. व त्यात हजारो जणांनी पहिला व दुसरा डोस टोचून घेतला. याबाबत समाजसेवक विशाल कारडा यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.