चाळीसगाव प्रतिनिधी । विवाह बंधनाच्या माध्यमातून एकमेकांशी जीवनभराची साथ निभावण्याची शपथ घेण्याचा प्रसंगीच मरणोत्तर अवयवदानाचा अनोखा संकल्प आज एका दाम्पत्याने केला.
याबाबत वृत्तांत असा की, चाळीसगाव येथील चेतन विजयकुमार चौधरी (वर) आणि ऐश्वर्या किशोर ठाकरे (वधू) यांनी आज लग्नाची खूणगाठ बांधताना सामाजिक बंधनाचीही गाठ बांधली. वधुवरांनी विवाहप्रसंगी मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरून वसुंधरा फाउंडेशन चे संस्थापक सचिन पवार यांच्या कडे सुपूर्द केले. यावेळी नगरसेवक दिपक पाटील, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे सदस्य अजय भावसार, सागर पल्लण आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या नंतर आपले विविध अवयव हे गरजू रूज्णांना उपलब्ध झाल्यास त्याचे पुढील आयुष्य सुखकर होईल हा मानवतावादी दृष्टीकोन वसुंधरा फाउंडेशनच्या सदस्यांनी समाज मनामध्ये निर्माण केल्यामुळे ही चळवळ आता जोर धरू लागली आहे. आपल्या लग्नसमारंभातच अवयव दान करणार्या या नवदांपत्यास समाजातील सर्व स्तरातून मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा मिळाल्यात सर्व नातेवाईक, मित्रपरिवाराने चेतन आणि ऐश्वर्या यांच्या मरणोत्तर अवयवदानाच्या संकल्पाचे कौतुक केले आहे.