जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह सात जणांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय. लाडेकर यांनी हा निकाल दिला आहे.
याबाबत वृत्त असे की. शहापूर ता. जामनेर येथील सौ. अनिता गजानन पाटील हिचा विवाह १२ फेब्रुवारी २०११ रोजी झाला होता. लग्नानंतर ती पती गजानन एकनाथ पाटील, सासरा एकनाथ त्र्यंबक पाटील, सासु सौ. गयाबाई, चुलत सासरे जगन त्र्यंबक पाटील व अमृत त्यंबक पाटील, चुलत सासु सरलाबाई जगन पाटील व चुलत नणंद वैशाली जगन पाटील यांचेसह शहापूर येथे राहात होती. लग्नानंतर साधारण एक वर्ष तिला सासरच्या मंडळींनी चांगले वागविले. त्यानंतर अनिताने विहीर खणण्यासाठी माहेरुन ५० हजार रूपये आणावेत, म्हणुन सासरच्या मंडळींनी मागणी केली, ती मागणी तिचे वडील नाना विष्णू पाटील रा. उमरविहीरे, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद यांनी पुर्ण केली. त्यानंतर अनिता गर्भवती असताना तिला सासरच्या मंडळींनी पुन्हा कौटुंबिक कारणास्तव माहेरी पाठवुन दिले. मुलगी झाल्यावरही कोणी बघायला व घ्यायला आले नाहीत, म्हणुन अनिताने पतीविरोधात सोयगाव कोर्टात खावटी दावा दाखल केला होता. त्यानंतर समझौता होउन अनिता परत नांदावयास गेली होती. त्यानंतरही तिचा मानसिक त्रास व छळ सुरू होता.
दरम्यान सन २०१३ च्या दिवाळीला अनिता माहेरी गेली व तिने नविन घर घेण्यासाठी वडिलांकडून दहा हजार रूपये व दागिने घेऊन गेली. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१३ रोजी अनिता शेतातील विहिरीत पडल्याचा निरोप मिळाल्यावर तिचे वडील व इतर शहापूर येथे गेले. त्यानंतर अनिताचे वडील नाना विष्णू पाटील यांनी, माझी मुलगी अनिता हिला विहीरीत ढकलून मारुन टाकले आहे, अशी फिर्याद जामनेर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र.नं.१३७/२०१३ नुसार भादंवि कलम ३०२, ३०४-ब, ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना अटक केली होती.
सदर खटला चौकशीचे वेळी सरकार पक्षातर्फे फिर्यादी नाना पाटील, मयत अनिताची आई सुवर्णाबाई, आत्या ताईबाई विष्णु पाटील, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविंद्र पाटील, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक योगीराज शेवगण यांचेसह एकुण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, अविश्वासार्हता आणि तपासकामातील तृटी या सर्व बाबींचा विचार करून जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ पी. वाय. लाडेकर यांनी सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींतर्फे ॲड. वसंत आर ढाके यांनी बचावाचे काम केले. त्यांना ॲड. प्रसाद व्ही. ढाके, ॲड. सौ. भारती व्ही ढाके, ॲड. उदय खैरनार, ॲड. शाम जाधव यांनी सहकार्य केले.