यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या विलगीकरणासाठी पोलीस वसाहतीतील इमारतीचा नवीन पर्याय म्हणून विचार करण्यात येत असून आमदार शिरीष चौधरी यांनी याची पाहणी केली.
याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या संसर्गाने तालुक्यात मागील काही दिवसांपासून आजाराने थैमान घातले आहे. येणार्या काळात ग्रामीण भागातून कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेता रावेर आणि यावल तालुक्यातील सर्व विलगीकरण कक्षात रुग्णांसाठी जागा उपलब्ध नसल्याने रावेर विधानसभेचे आमदार शिरिषदादा चौधरी विभागीय प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांनी पोलिस वसाहतीतील नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या पोलिस वसाहतीत इमारतीची पाहणी केली. त्यांनी कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी या इमारतीचा उपयोग करता येईल का याविषयी माहिती जाणून घेतली. याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आमदार चौधरी व प्रांत अधिकारी डॉ थोरबोले यांनी यावल चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची भेट घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून घेण्यासंदर्भात अधिक माहिती घेतली.